मुंबई, दि.२५ : राज्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून राज्यातील पूर स्थितीबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जलसंपदा विभाग, ऊर्जा विभाग,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यात बचाव कार्यासह पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी तत्पर आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यात पुणे येथे उद्भवलेली पूर परिस्थिती लक्षात घेता पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफ पथकास पाठिवण्यात आले आहे. तसेच पाऊस व धरणातील विसर्गामुळे निर्माण झालेल्या पुराचा आढावा घेण्यात आला. २४ जुलै २०२४ रोजी प्राप्त हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, सातारा, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रात्री ११.४६ वाजता रेड अलर्ट सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज दि 25 जुलै रोजी पुढील 3 तासांत राज्यातील ठाणे, रायगड, सातारा, पुणे, मुंबई, मुंबई शहर या 6 जिल्हयांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशीव, लातूर, परभणी, नांदेड या 7 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
विभागीय आयुक्त, पुणे यांना जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात उपस्थित राहून आढावा घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जवळील लवासा व ताम्हिणी येथे दरड कोसळल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना आवश्यक सुविधा भोजन व निवास याबाबतची व्यवस्था करण्याच्य सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकता भासल्यास जिल्हा विकास निधीमधून खर्च करण्याबाबतचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त श्री. पवार यांनी दिले आहेत. धरणांचा साठा ७५ टक्क्यापर्यंत पोहोचल्यामुळे या धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये होवू शकतो. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ पथक आवश्यक साहित्यासह तैनात करण्यात आले आहे.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपत्तीमध्ये घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहून मदतीसाठी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा. तसेच स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती कळवावी, दरडग्रस्त,पूरग्रस्त,सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.
०००
संध्या गरवारे/विसंअ/