पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

0
14

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध गावांमधील प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते. यावेळी दूधगंगा नदी डावा कालवा, कागल शहर हद्दीपासून हातकणंगले हद्दीपर्यंत जाणाऱ्या कालव्याच्या कामास गती देणेसंदर्भात आढावा बैठक झाली. कालव्याचे कामकाज तातडीने सुरु करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या. कागल शहरापासून पुढे कसबा सांगाव आणि तिथून पुढच्या गावांच्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळण्याची अडचण झाल्याचे त्यांनी सांगितले. धामणी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत, हासूर बु. ता. कागल येथील जमीन भोगवटादार वर्ग -१ दोन करणे व कागल येथील सुंदराबाई कुरणे वसाहत ही भोगवटादार २ असून भोगवटादार वर्ग-१ होणेबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत महसूल विभागाला सूचना केल्या. कागलच्या सुंदराबाई कुरणे या झोपडपट्टीतील ५० घरांचे दोन वर्षांपूर्वी नियमितीकरण झालेले आहे. परंतु घरमालकांच्या प्रॉपर्टी कार्डवर वर्ग -दोन चा शेरा आहे. घर बांधकामासाठी कर्ज काढताना, बँकेला तारण देताना अडचणी उद्भवतात. तो जाऊन वर्ग -एक व्हावा अशी प्रॉपर्टी धारकांची मागणी आहे. याविषयी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवा. मुंबईत नगर विकास मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावू, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

तसेच काळभैरी मंदिर, गडहिंग्लज येथील फॉरेस्ट खाते जमिनबाबत व धर्मदाय देवस्थान असलेले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान हस्तक्षेप बंद करणेबाबत झालेल्या बैठकीत अतिरिक्त जागेच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. गडहिंग्लजच्या काळभैरी देवालयाची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे झालेली आहे. त्याला गडहिंग्लजकरांची संमती नाही. त्यामुळे याबाबत लवकरच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुनावणी व बैठक घ्यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. याचबरोबर सिध्दी हौसिंग सोसायटी, लिंगनूर अ वर्ग मधून ब वर्ग करण्याकरीता रक्कम भरण्यास माफ करुन मिळणेबाबत, गांधीनगर को.ऑ. हौसिंग सोसायटी लि. गडहिंग्लज जि. कोल्हापूर रजिस्टर नं. ६८० स्थापना १९४९ मिळकतीचे वैयक्तिक मिळकत पत्रिका मिळणेबाबत झालेल्या बैठकीत गडहिंग्लज शहरातील गांधीनगर येथील मोजणी होऊन बाह्य हद्दी निश्चित झालेल्या आहेत. येथे आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करून प्लॉटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गडहिंग्लज येथील मेटाचा मार्ग आणि दुंडगा मार्ग येथे पाच झोपडपट्टी आहेत, त्यापैकी एक झोपडपट्टी चे नियमितिकरण झाले आहे. तसेच;  १९१ झोपडपट्ट्यांची मोजणी पूर्ण होऊन त्याची माहिती घेतलेली आहे. येत्या सोमवारपर्यंत तातडीने बैठक घेऊन या सर्व झोपडपट्ट्या नियमित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

संकेश्वर ते बांदा हायवे वरील स्ट्रिट लाईटचे बिल कोणाकडून भरणेबाबत बैठक झाली. गिजवणे ता. गडहिंग्लज हे गाव आंबोली -संकेश्वर महामार्गावर येते. या महामार्गावर लागणाऱ्या पथदिव्यांचा वीजबिलाचा खर्च ग्रामपंचायतींवर पडणार आहे. गिजवणे ग्रामपंचायतीचा या गोष्टीला विरोध आहे. तुम्ही या महामार्गावर महामार्गासाठी दिवे लावत आहात. तसेच या ग्रामस्थांनी जोड रस्ते केले नसल्याकडेही लक्ष वेधले. संबंधित विभाग प्रमुखांना नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसिलदार कागल अमर वाकडे, मुख्याधिकारी उपस्थित होते.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here