मुंबई, दि. 30 : सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. समितीने दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले.
मंत्रालयातील समिती कक्षात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप निवाले, संघटनेचे गोविंद परमार, राजेश रेवते, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अ.रा. चारणकर, मुंबई महापालिकेचे उपायुक्त (घनकचरा) सं. सु कबरे, सहायक कामगार आयुक्त श्री. शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोरवे आदी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेतंर्गत घरकुले देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त व नगर पालिका मुख्याधिकारी यांनी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा. जमिनीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे देऊन अशा जमिनींवर सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरकुले बांधण्यात यावीत. सध्या मुंबई महापालिका घरकुले बांधत आहेत. ही घरकुले सेवाज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना वितरीत करावी. तसेच मोठ्या मल:निस्सारण वाहिनीमध्ये अजूनही मानवी हस्तक्षेपाने कामे करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही कामेही यांत्रिकीकरणाने करण्याबाबत स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
०००
निलेश तायडे/विसंअ