मुंबई, दि. ३१ :- अमरावती येथील नांदगाव पेठजवळ उभारण्यात येत असलेला पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क हा राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार रवी राणा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, सहसचिव प्राजक्ता लवंगारे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क हा जागतिक दर्जाचा व्हावा, अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसारच येथील सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी जागतिक दर्जाचे गुंतवणुकदार येण्यासाठी त्यांना त्या प्रकारचे सोयी सवलती देण्यात याव्यात. तसेच येथील उद्योगांना सौर ऊर्जेसाठी सवलती देण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करावी.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून स्थानिकांना रोजगार निर्मितीही होणार आहे. या प्रकल्पाची पर्यावरण विषयक मंजुरी घेऊन पायाभूत कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, जेणेकरून प्रकल्प कार्यान्वित होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी श्री. शर्मा यांनी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या सद्यस्थितीसंदर्भात सादरीकरण केले. पीएम मित्रा टेक्सटाईल हा अमरावतीत सुमारे १०२० हेक्टर जागेवर उभारण्यात येत आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया झाली असून पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा ग्राऊंड फिल्ड प्रकल्प असून यामध्ये वस्त्रोद्योग संबंधी प्रशिक्षण, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, आवास प्रकल्प आदी सुविधा असणार आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अंमलबजावणी संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/स.सं