मुंबई, दि. 2 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत ‘सारथी’ संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून संस्थेचे 20 विद्यार्थी केंद्रीय सेवेसाठी निवडले गेले आहेत. निवड झालेल्या ‘सारथी’च्या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 जणांना नुकतेच कॅडरवाटप करण्यात आले. 16 पैकी सहा जणांना ‘आयएएस’, दोघांना ‘आयपीएस’, पाच जणांना ‘आयआरएस’, दोघांना ‘आयआरएमएस’, तर एका उमेदवाराला ‘आयए अॅन्ड एएस’ कॅडर मिळाले आहे. चार जण प्रतिक्षायादीत आहेत. त्यांनाही लवकर कॅडर मिळण्याची अपेक्षा आहे. अन्य केंद्रीय सेवांसाठीही सहा जणांची निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच ‘सारथी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन मंत्रालयाअंतर्गत ‘सारथी’ संस्था कार्यरत असून राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था विविध योजना, उपक्रम राबविते. ‘सारथी’मार्फत विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य करण्यात येते. ‘सारथी’च्या या प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे. यावर्षी युपीएससी परीक्षेत ‘सारथी’चे 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश ग्रामीण महाराष्ट्रातील आहेत. उत्तीर्ण वीस विद्यार्थ्यांमध्ये पुण्यातील सहा, नाशिकमधील पाच, नगरच्या दोन, अकोला, हिंगोली, सातारा, जळगाव, कोल्हापूर, बुलडाणा, वाशिम येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
गेल्या वर्षीही 2022-23 मध्ये ‘सारथी’च्या 25 विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यावेळी दोन जण ‘आयएएस’, सहा जण ‘आयपीएस’, दोन जण ‘आयआरएस’, एक ‘आयएफएस’, तीन ‘आयएफओएस’, पाच जण ‘सीएपीएफ’ तसेच अन्य सेवांसाठी सहा जण पात्र ठरले होते. यंदा 2023-24 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या 25 पेक्षा एकने वाढली असून यंदा 26 जण केंद्रीय सेवेसाठी निवडले गेले आहेत. त्यापैकी तब्बल सहा जण ‘आयएएस’ झाले आहेत. ही कौतुकाची बाब आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या (एमपीएससी)च्या स्पर्धा परीक्षेतही ‘सारथी’चे विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत. वर्ष 2022-23 आणि 2023-24 वर्षात तब्बल 158 विद्यार्थी वर्ग-एक आणि 324 विद्यार्थी वर्ग-दोन, असे एकूण 482 विद्यार्थी राज्य सेवेसाठी निवडले गेले आहेत. केंद्रीय आणि राज्य सेवा स्पर्धापरीक्षेमध्ये ‘सारथी’च्या माध्यमातून प्रशिक्षित उमेदवारांची संख्या दरवर्षी वाढत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
—–०००००——