करिअरच्या नव्या दिशा पुस्तक युवकांना मार्गदर्शक – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे ‘करिअरच्या नव्या दिशा’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल,असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

श्री. लोढा यांच्या हस्ते आज मुंबईत ‘करिअरच्या नव्या दिशा’ या पुस्तकाचे मुंबई महापालिका येथे प्रकाशन झाले,त्याप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री श्री. लोढा  म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने राज्याचा कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता  विभाग गतिमानतेने कार्य करीत आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. कौशल्य विकास विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना सुरू केली असून या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

युवकांनी अधिक सक्रिय होऊन या संधींचा लाभ घेतला पाहिजे. स्वतःबरोबर देशाचे हित साधले पाहिजे. देशातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहोरात्र झटत आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुस्तकाचे लेखक महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी परिश्रमपूर्वक, अतिशय अभ्यास करून लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मंत्री श्री. लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रारंभी पुस्तकाची माहिती देताना श्री.भुजबळ यांनी सांगितले की, या पुस्तकात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्य सरकारांच्या मिळून जवळपास ७०० अभ्यासक्रमांची माहिती आहे.  या पुस्तकामुळे युवकांना आपली आवड ओळखून करिअरची निवड करण्यास नक्कीच मदत होईल.

आवडीनुसार करिअर निवडल्यास थकवा, कंटाळा, तणाव न जाणवून हे युवक आनंदाने आपले जीवन व्यतीत करू शकतील. या पुस्तकाचे प्रकाशक न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनच्या प्रकाशक अलका भुजबळ यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

0000

संध्या गरवारे/वि.संअ/