जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेस एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये मंजूर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राज्य शासनासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार

मुंबई, दि. ७ :- पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेस आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून २ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल राज्य शासनासह उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आभार मानले आहेत. जुन्नरच्या आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या संस्थेला चालना देण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर व्हावे यासाठी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता.

कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून हिरडा या वनोत्पादनावर प्रक्रिया करून औषध तयार करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग करून जुन्नर तालुक्याच्या विकासास हातभार लावण्यासह आदिवासी बांधवांना उद्योजकतेकडे घेऊन जाणाऱ्या, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणाऱ्या सहकारी संस्थेस प्रोत्साहन देणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य मंत्रिमंडळाने आज २ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यास मंजुरी दिल्यामुळे आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. त्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

०००००