विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४; एकीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

0
10

18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.25.06.2024 पासून राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे,  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दुर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना १-८ तयार करणे, दि. ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकीकृत प्रारूप यादी तयार करणे. इत्यादी पुनरिक्षण – पूर्व उपक्रम आत्तापर्यंत राज्यात राबवण्यात आलेले आहे.

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची एकिकृत प्रारुप मतदार यादी दि.06 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रारुप यादीमध्ये यापूर्वी झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील राज्यातील एकूण मतदारांची संख्या, एकूण मतदान केंद्रे, उतुंग इमारती व समूह सहकारी गृह निर्माण सोसायटींमधील मतदान केंद्रांची संख्या यांमध्ये खालीलप्रमाणे वाढ झालेली दिसून येत आहे.

 

अ.क्र.       बाब लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 एकीकृत प्रारुप मतदार यादीतील
1 मतदार यादीतील एकुण मतदार संख्या 9,29,43,890 9,36,75,934
2 राज्यातील एकुण मतदान केंद्रांची संख्या 98,140 1,00,186
3 उतुंग इमारती व समूह सहकारी गृह निर्माण सोसायटींमधील मतदान केंद्रांची संख्या 150 1,165

 

दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी एकीकृत प्रारूप मतदार यादी प्रकाशित झालेली आहे. यामध्ये सर्व मतदारांची अद्ययावत माहिती समाविष्ट आहे. ही मतदार यादी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यादी भागासहीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही यादी डाऊनलोड करून तसेच www.voters.eci.gov.in  या संकेतस्थळावरून अथवा Voter Helpline हे मोबाइल अॅपचा वापर करून मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव आहे की नाही, तसेच नाव असेल तर त्यासोबतच वैयक्तिक माहिती आणि पत्ता हे तपशील तपासून पाहता येईल.  ही यादी पाहण्यासाठी मतदार आपल्या जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला देखील भेट देऊ शकतील.

दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी :

दि.०६ ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ते २० ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ह्या कालावधीत नागरिकांना नविन मतदार नोंदणी करणे, मतदारांची नावे, पत्ते, आणि अन्य तपशील दुरुस्त्या व बदल, तसेच मतदार यादीतील नोंदींना आक्षेप करण्यासाठी खालील प्रकारचे अर्ज भरता येतील. यासोबतच, मृत्यू /कायमचे स्थलांतर या आणि अशा योग्य कारणांसाठी मतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्जही भरता येईल.

अर्ज क्रमांक ६ – नव मतदार नोंदणीसाठी.

अर्ज क्रमांक ८ – मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलात बदल/दुरुस्त्या- अद्ययावतीकरण, पत्त्यातील बदल/स्थलांतर, दिव्यांगत्वाचे चिन्हांकन, मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी हे तपशील जोडणे, मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावे यासाठी विनंती करणे.

 

अर्ज क्रमांक ७ – योग्य कारणासाठी मतदार यादीतून नाव वगळण्याच्या विनंतीसाठी.

अर्ज क्रमांक ६ब – मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यासाठी.

हे सर्व अर्ज www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाइल अॅप वापरून ऑनलाईन भरता येतील. यासोबतच जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट देऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये ऑफलाईन पद्धतीनेही भरता येतील.

प्रत्येक अर्जासोबत गरजेनुसार आपले छायाचित्र, पत्ता तसेच वयाच्या पराव्याचा दस्तऐवज, वा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या इतर दस्तऐवजाची स्व-स्वाक्षरीकृत प्रत जोडणे अनिवार्य असणार आहे.

 

विशेष शिबिरे :

या कार्यक्रमाच्या काळात दि.10, 11 ऑगस्ट व दि.17, 18 ऑगस्ट, 2024 या तारखांना शनिवार आणि रविवार या दिवशी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणिकरीता विशेष शिबिरे आयोजित केली जातील.

 

दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी :

कार्यक्रमाच्या कालावधीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर अर्थात दावे आणि हरकतींवर नियमांनुसार कार्यवाही करून ते दि. २९ ऑगस्ट २०२४ (गुरूवार) पर्यंत निकाली काढले जातील.

 

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी :

दावे आणि हरकती नियमांनुसार निकाली काढल्यानंतर दि. ३० ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. यात या कार्यक्रमादरम्यान दावे आणि हरकतीसाठी उपलब्ध करून दिलेल्या कालावधीत आलेल्या अर्जांवरील कार्यवाहीनुसार नव्या तसेच बदल आणि दुरुस्ती केलेल्या मतदारांच्या नावासहीतची अंतिम यादी समाविष्ट असेल.

 

मतदार नोंदणीसाठी महत्वाचे :

दि. १ ऑक्टोबर २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेले भारतीय नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र असतील.

 

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी :

मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • ceo.maharashtra.gov.in आणि www.voters.eci.gov.in ही संकेतस्थळे.
  • Voter Helpline हे मोबाइल अॅप.
  • मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय.

मदत क्रमांक :

नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास मतदार मदत (Helpline) क्रमांक १९५० किंवा १८००२२१९५० वर संपर्क साधावा.

 

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here