विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून महसूल पंधरवडा, मतदार यादी, मतदार नोंदणीबाबत आढावा

0
18

अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली, दि. ८ (जिमाका) : १ ऑगस्टपासून महसूल पंधरवडा सुरू आहे. या कालावधीत महसूल विभागातर्फे अनेक लोकोपयोगी विविध उपक्रम राबवले जातात. मात्र हे उपक्रम राबवले जात असताना न्याय मागणीसाठी आलेल्या तक्रारकर्त्याचे समाधान ही सर्वात मोठी बाब आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यरत रहावे, त्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल पंधरवडानिमित्त त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणे विभाग उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा उंटवाल-लड्डा, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रांताधिकारी सर्वश्री श्रीनिवास अर्जुन, विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या कार्यशैलीवरच त्या त्या जिल्ह्याची प्रतिमा ठरते. या प्रतिमेच्या जपणुकीसाठी सर्वांनी कार्यरत रहावे, असे सांगून महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते, तलाठी भरती परीक्षेत माजी सैनिक प्रवर्गातून निवड झालेले सर्वश्री अरुण माळी, सचिन कुंभार, वसंत करांडे, बाबासाहेब माळी, दादासाहेब खोबांरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले तर सलोखा योजनेअंतर्गत लाभ दिलेले शेतकरी सर्वश्री लक्ष्मण पाटील, धनाजी पाटील, संभाजी माने, बाळकृष्ण माने यांना ७ /१२ उतारा देण्यात आला. त्याचबरोबर इ -महाभूमी अंतर्गत श्रीमती वैशाली वाले (मंडल अधिकारी ), अमोल सानप (मंडल अधिकारी ) व शिवाजी सकटे (तलाठी ) यांना लॅपटॉप व प्रिंटर प्रदान करण्यात आला.

०००

मतदार यादीकामी राजकीय पक्षांनी आपले योगदान द्यावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली, दि ८ (जिमाका): मतदार यादीमध्ये समाविष्ट असणारा कोणताही पात्र मतदार, मतदानापासून वंचित राहू नये हे निवडणूक आयोगाचे सर्वात महत्त्वाचे धोरण आहे. याबाबत सांगली जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेच, परंतु, राजकीय पक्षांनीही याबाबत त्यांचे योगदान द्यावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध प्रारूप यादीचा बारकाईने अभ्यास करावा व जर यामध्ये आपले काही आक्षेप असतील तर ते विहित मार्गाने व विहित वेळेत नोंदवावेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, 30 ऑगस्ट रोजी अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत या प्रारूप यादीवर संबंधित आक्षेप नोंदवू शकतील. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या शंकांचे निरसन केले जाईल. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. नारायण घोरपडे, सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशितोष धोतरे, एस उरुणकर, कम्युनिस्ट पक्षाचे उमेश देशमुख तसेच बहुजन समाजवादी पार्टीचे लहरीदास कांबळे आदी उपस्थित होते.

०००

प्रत्येक मतदाराची नोंद मतदार यादीत झाल्याची खात्री करा –  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली, दि. ८ (जिमाका): मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्या मतदाराची नोंद मतदार यादीमध्ये झाली आहे का ? याची खात्री करावी. त्याचबरोबर मतदान केंद्र बदलाबाबतची माहिती सामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यावी, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आज सांगलीला भेट देऊन आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणे विभाग उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा उंटवाल-लड्डा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, प्रांताधिकारी सर्वश्री श्रीनिवास अर्जुन, विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले की, एकही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांची नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीमध्ये नाव चुकले असल्यास किंवा नोंदणी करणे बाकी असल्यास अथवा नावे वगळली गेली असल्यास सर्व संबंधित मतदारांची खात्री करून तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या निवडणुकीचे कामकाज वेळेत व अचूकरित्या पार पाडावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. निवडणुका नि:पक्षपणे पार पडतील यासाठी प्रशासनाने काम करावे. या कामात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नये अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आयुक्तांना जिल्ह्यातील मतदार केंद्रे तसेच पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार श्रीमती डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, अर्चना कापसे, मीना बाबर, दीप्ती रेटे, शामला खोत, अश्विनी वरुटे तर सर्वश्री तहसीलदार अजित शेलार, सचिन पाटील, सागर ढवळे, उदय गायकवाड तर अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

०००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here