‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा उद्या राज्यस्तरीय शुभारंभ; ऑगस्ट क्रांती मैदान येथून तिरंगा रॅलीने होणार सुरुवात

0
16

मुंबई, दि. ८ :  राज्यात घरोघरी तिरंगा अभियान दि. ९ ते १५  ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राज्यस्तरीय शुभारंभ ऑगस्ट क्रांती मैदान येथून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार आहे. हुतात्म्यांना अभिवादन करून आणि तिरंगा रॅलीने अभियानाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.

श्री.खारगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राने स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान दिलेले असून देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा अभियानही संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात साजरे केले जाणार आहे. सर्व जिल्हा, तालुका आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी होत आहे. कला, संगीत, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे.

सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर त्यासोबतच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि.१३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने सन २०२२ पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा )अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून  या वर्षी देशभरात  13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’  अभियान राबविले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा अभियान’ साजरे केले जाणार आहे.   मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात यावे, असे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी यावेळी सांगितले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here