छत्रपती संभाजीनगर, दि.८, (विमाका) : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात 26 लाख 24 हजार 461 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आदींसह विविध योजनांच्या माहितीबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त जगदिश मिनियार, उपायुक्त सुरेश वेदमुथा आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर विभागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत 26 लाख 24 हजार 461 अर्ज प्राप्त झाले असून 24 लाख 36 हजार 504 अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. अंशत: 91 हजार 73 अर्ज नाकारण्यात आले असून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तत्परतेने या अर्जांनाही मंजूरी देण्यात येणार आहे. विभागात एकूण आतापर्यंत 94 टक्के अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विभागातील 20 हजार 660 पदे विविध आस्थापनांनी अधिसूचित केली आहेत. 20 हजार 462 उमेदवारांनी या योजने अंतर्गत नोंदणी केली असून यामधील 3 हजार 549 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात अग्रेसर असल्याचा उल्लेख विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी केला.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात उज्ज्वला योजने अंतर्गत एकूण 14 लाख 7 हजार 325 गॅस जोडणीधारकांची संख्या आहे. यामध्ये 7 लाख 10 हजार 324 गॅस जोडणीधारकांची ई-केवायसी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उर्वरित काम प्रगतीपथावर सुरू आहे.
मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात शैक्षणिक सत्र 2024-25 या शैक्षणिक सत्रात 24 हजार 500 प्रवेशित मुली अपेक्षित आहे. यापैकी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अंदाजे 16 हजार विद्यार्थींना 100 टक्के शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींना मोफत तांत्रिक शिक्षण योजने अंतर्गत शैक्षणिक सत्र 2024-25 साठी 11 हजार विद्यार्थींनी असा लक्षांक ठेवण्यात आला असल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली असून अर्ज स्वीकारणे व छाननी करण्याची कार्यवाही सूरू करण्यात येत असल्याची माहिती श्री.गावडे यांनी दिली.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेचा लाभ 7.5 एचपी पर्यंत विद्युत भार असणाऱ्या कृषि वीज ग्राहकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 7.5 एचपी पर्यंत असणाऱ्या एकूण 11 लाख 46 हजार 903 कृषि ग्राहकांना सुमारे 512.36 कोटी रुपयांचे त्रैमासिक बिले माफ होऊन योजनेचा लाभ मिळणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहायक साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र यांच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून अर्ज स्वीकारणे व छाननी करण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेसाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी सांगितले.
०००