छत्रपती संभाजीनगर दि.९ (जिमाका): भांगशी माता गड येथे विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भांगशी माता गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. भांगशी माता गड, शरणापूर येथे आयोजित श्री पशुपतयेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीक्षेत्र भांगशी माता गड, शरणापूर येथील पशुपतयेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. सोहळ्याचे उदघाटन मंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. रुद्राभिषेक, रुद्रयज्ञ सोहळ्यासोबत वृक्षारोपण व रक्तदान शिबीरही घेण्यात आले. महंत श्री.श्री.1008 परमानंद गिरी महाराज यांची यावेळी उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मंजूर निधी व्यतिरिक्त मंदिर परिसरातील रस्ते विकासासह येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आणखी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, तसा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, केतन काजे, शरणापूर सरपंच संध्या सदावर्ते आदींसह भाविक मोठ्या संख़्येने उपस्थित होते.
०००