क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ९, (जिमाका) : क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या, अशा सूचना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किर्तीकर मिरजकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव दुरूस्ती, 400 मिटर सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम, व इतर आवश्यक दुरूस्ती, सुरक्षा रक्षक सेवा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे वसतिगृहाबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिल्या.

०००