- घोणसी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन
लातूर, दि. ९ : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यादृष्टीने जळकोट, उदगीर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला प्राधान्य दिल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
जळकोट तालुक्यातील घोणसी येथे नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे, तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार, डॉ. प्रशांत कापसे, नायब तहसीलदार राजाराम खरात, सरपंच यादवराव केंद्रे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा, यासाठी घोणसी, मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मंगरुळ येथील प्राथमिक केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून घोणसीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे आज भूमिपूजन होत आहे. यापुढेही ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर आणि जळकोट तालुक्यातील नागरिकांसाठी दळणवळण सुविधा निर्माण करणे, विविध प्रशासकीय इमारती, विविध समाजाची सभागृहे, भवन उभारण्यासह महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व विकास कामांमुळे दोन्ही तालुक्यातील नागरीकांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळत आहेत. सिंचनासाठी बॅरेज, पाझर तलावांची निर्मिती करण्यात आल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये दरमहा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण काळात शैक्षणिक अर्हतेनुसार दरमहा सहा ते दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषि पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
०००