नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार -गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.१०,(विमाका) :  नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीत पुर्ण होईल, असा विश्वास गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर  क्षेत्रविकास मंडळ प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत  नक्षत्रवाडी येथील 1056 अत्यल्प उत्पन्न गट अंतर्गत गृह प्रकल्पाचे भूमिपूजन गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ना सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षत्रवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार संजय सिरसाट, गृहनिर्माण  क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य, कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, अनिल मकरिये, हर्षदा सिरसाट, विवेक देशपांडे  आदी उपस्थित  होते.

गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरजू कुटुंबाला आपले हक्काचे असावे म्हणून त्यांनी 2014  पासून प्रधानमंत्री योजनेतंर्गत देशभरात 3 कोटी घरे उभारण्यात आली आहेत तर 3 कोटी घरांची कामे बाकी आहेत. नक्षत्रवाडी मधील 6.4 हेक्टर क्षेत्रावर 1056  सदनिकांच्या प्रकल्पास मंजूरी मिळाली असून सदर घराची किंमत 14 लाख ठेवण्यात आली आहे.  त्यापैकी 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

नक्षत्रवाडी प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीमध्ये पुर्ण होईल. यामध्ये स्लॅबप्रमाणेच भिंतीचेही काम करण्यात येणार आहे.सर्व इमारती भूकंप अवरोधक असण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये रस्तालगत, मोकळया जागेवर बाग, वृक्षरोपण, पथदिवे, सुरक्षा सुरक्षा विभाग आदी सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागात म्हाडाकडून यापुर्वी  1494 घराची लॉटरी प्रमाणे सोडत काढण्यात आली आहे.  2800 घराची उपलब्धता बाकी आहे.

महाराष्ट्रात  म्हाडाने 1 लाख घरे तयार करण्याचा संकल्प केला आहे. तर मुंबई येथील गिरणी कामगार यांच्यासाठी 98 हजार कुटुंबीयांची स्वतंत्र गृह प्रकल्प निर्मितीचा संकल्प आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रकल्पासाठी 50 ते 52 हजार कोटी रुपयाची  नवीन कंपन्याची गुतंवणूक करण्यात येणार आहे.

आमदार संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 200 कोटी रुपयाचा निधी हा ड्रेनेज लाईनसाठी मंजूर करण्यात आला असून भविष्यात पाईपलाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच म्हाडा हा प्रकल्प माझ्या मतदार संघात निर्सगरम्य ठिकाणी उभा राहतोय याचा  मला आनंद आहे. सुत्रसंचालन ज्योती सुर्यवंशी यांनी केले तर आभार सिमरन सोळंखी यांनी मानले.कार्यक्रमास नक्षत्रवाडी येथील ग्रामस्थ व म्हाडाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

०००