नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार; नव्याने बांधकाम करताना जसं नाट्यगृह होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना
कोल्हापूर दि. ११ (जिमाका) : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्याने काम थांबले ही अडचण येवू देणार नाही, निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
आगीमुळे नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज पाहणी केली, त्यावेळी उपस्थित कलावंतांशी संवाद साधाला. ते म्हणाले, ऐतिहासिक वास्तूचे जसे बारकावे असतात तसेच पुन्हा करण्यासाठी या कामाला वेळ लागू शकतो परंतु कामे चांगली करण्यात येतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर करण्यात येणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमकार दिवटे तसेच महापालिका प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री यांनी काल्हापूरमध्ये आल्यानंतर विमानतळावरून थेट केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. सुरूवातीला आल्यानंतर त्यांनी भीषण आगीमुळे भस्मसात झालेल्या मुख्य रंगमंचाची पाहणी केली. याठिकाणी त्यांनी शक्य असेल तर नव्याने काम करताना नाट्यगृहाची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. नाट्यगृहाशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं जोडलं गेलं आहे. जशा कोल्हापूरवासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. हे पुनर्बांधनीचे काम मोठं असून यासाठी लागणारा वेळ आर्किटेक्चरच सांगतील असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या निधीपेक्षा जरी जास्त निधी लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
त्यानंतर त्यांनी बाहेरील संरक्षक भिंतीची पाहणी करून खासबाग मैदानावरील स्टेजच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एसी नव्याने बसविताना त्याचे बाहेरील युनिट सुरक्षित ठिकाणी बसवा. खासबाग मैदान आणि नाट्यगृहासाठी आवश्यक छताचा पत्रा उत्कृष्ट दर्जाचा वापरा. बाहेरील संरक्षक भिंतीही जुने पुरावे किंवा छायाचित्र पाहून चांगल्या पद्धतीने तयार करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छतागृह, इतर भिंती आणि दगडांचे बांधकाम करताना मजबूत, एकसारखे ऐतिहासिक दिसेल अशा पद्धतीने करा. ऐतिहासिक बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्चरची निवड करून त्यांच्याकडून सर्व इमारत जशी आहे तशी एकसारखी दिसेल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.
००००