मुंबई, दि.१३: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबईकरांचे खरे चैतन्य असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
हाँटेल ट्रायडेट येथे टाटा मुंबई मॅरेथॉनमधील नोंदणीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक उपस्थित होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले,मुंबई मॅरेथॉन ही दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबईत येथे आयोजित केलेली वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन आहे. टाटा समूहाच्या प्रायोजकत्वाच्या कारणास्तव ही टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणून देखील ओळखली जाते. ही आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन तसेच खंडातील सर्वात मोठी जनसहभागी क्रीडा स्पर्धा आहे.
जागतिक स्तरावरील स्पर्धा मुंबईत होत असल्याचा अभिमान आहे. मुंबईतील मोठ्या रस्त्यावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आता कोस्टल रोड झाला आहे. मुंबईचा विकास होत आहे.
मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार, खेळाडू, उद्योगपती यामध्ये सहभागी होतात. राज्य शासन, महानगरपालिका, पोलीस, सर्व यंत्रणा यामध्ये सहभागी होवून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.
विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे.मुंबई ही फक्त देशाची आर्थिक राजधानी नाही तर या ठिकाणी टाटा मुंबई मॅरेथॉन सारखे जागतिक उपक्रम राबविण्यात येतात. १९ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत आमची मुंबई तयार आहे. आयोजकांचे अभिनंदन करुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉनच्या प्रवर्तकांनी आज जाहीर केले की या स्पर्धेसाठी नोंदणी 14 ऑगस्ट 2024 पासून सकाळी 7 वाजता www.tatamumbaimarathon.procam.in वर सुरू होईल.
०००