विविध योजना व उपक्रमांनी महसूल पंधरवडा साजरा

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि .१४:–नागरिकांमध्ये महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत जागरूकता वाढावी, महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्या,  शासनाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी  महसूल दिन व १  ते १५ ऑगस्ट, २०२४ कालावधीत महसूल पंधरवडा करून विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना मुंबई शहर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ

महसूल पंधरवडा कालावधीत महाराष्ट्र विधानसभे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर  यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान पात्र लाभार्थी यांना उत्पन्न दाखला व विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव,  अपर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी व महसूल अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

२ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” उपक्रमाची माहिती जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. संदिप गायकवाड यांना दिली. उपस्थित विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी यांना योजनेची व्याप्ती व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” याबाबत  जेष्ठ नागरिकांना प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी राज्यातील सर्व धर्मातील वयोवृद्धांसाठी योजना लागू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनात ३ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी कार्यालयात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली.  कार्यालयातील अभिलेखांचे व्यवस्थापन कामे करण्यात आली.

तर “जमिन विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी नागरिकांना मुंबई शहरातील शासकीय भाडेपट्टा करिता भोगवटदार वर्ग १ च्या हस्तांतरण बाबत राबविण्यात येणाऱ्या प्रकियेची माहिती नगर भूमापन व भूमि अभिलेख शाखेमार्फत देण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील जमीन विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.

6 ऑगस्ट रोजी “पाऊस आणि दाखले” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय हवामान विभाग कुलाबा येथील अतिरिक्त महासंचालक सुनिल कांबळे यांचे पर्जन्यमान व इतर हवामान घटकांविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले. पाऊस व इतर हवामानाचे अंदाज कशाप्रकारे व्यक्त केले जातात याबाबत माहिती दृक श्राव्य माध्यमातून देण्यात आली. तसेच मुंबईतील हवामान परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

७ ऑगस्ट रोजी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जयहिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, एसएनडीटी कॉलेज, केसी कॉलेज इत्यादी महाविद्यालयांना भेटी देऊन युवकांशी संवाद साधला. ८ ऑगस्ट रोजी “महसूल जन संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन, ९ ऑगस्ट रोजी “महसूल ई-प्रणाली” बाबत, ११ ऑगस्ट रोजी “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन” करण्यात आले.

दिव्यांग मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरण

१२ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तीकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली. ८ लाभार्थ्यांना मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.१३ रोजी “कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद”तर १४ ऑगस्ट रोजी ” महसूल पंधरवडा वार्तालाप” दिन झाला.तसेच १५ ऑगस्ट रोजी ” महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल पंधरवडा सांगता समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

००००००

किरण वाघ/विसंअ