सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार

0
14

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर दि.१५(विमाका):  विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखू या, असे आवाहन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदिश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

पालकमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेचे रक्षण करतांना प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

रोजगार निर्मितीला चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. १२० एकर जागेत हा प्रकल्प येत असून या जागेचे वाटपपत्रही त्या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ९०० जणांना थेट रोजगार मिळेल. शिवाय अन्य लहान उद्योगही त्यामुळे कार्यान्वित होतील. त्याचप्रमाणे टोयोटा-किर्लोस्कर प्रकल्पाची २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे. मोटार वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळेही ८ हजार जणांना प्रत्यक्ष व ८ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. एथर एनर्जी हा प्रकल्प दुचाकी निर्मितीचा प्रकल्प असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

उपेक्षित घटकांच्या विकासासाठी योजना

समाजातील सर्वच उपेक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनींना या योजनेमुळे दरमहा १५००/- रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागेल. जिल्ह्यात ५ लाख ३२ हजार ७६९ इतक्या बहिणींचे नावे या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाली असून राज्यात आपला जिल्हा अग्रेसर आहे. बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गतही जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८५८ महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात २३१८ रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली असून २२२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल शिवाय त्यांना सहा महिन्याचे विद्यावेतनही मिळेल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांच्या विकासाला मिळेल चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन कार्यान्वित केले आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यातील दुग्धविकासाला चालना देण्यासाठी शासनाने ३२८ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार असून ३ वर्षाच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी निर्णय

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभदेखील लाखो नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई व शबरी या तिन्ही योजनेचे मिळून ७ हजार ७५८ घरकुले पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक २५५.०८ टक्के साध्य करण्यात आले. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ती प्रगती पथावर आहेत.

पाणीपुरवठा, क्रीडांगण विकास, स्वच्छतेस प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी नळाला २४ तास पाणी आता स्वप्न नव्हे तर वास्तव होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून महापालिकेच्या हिश्श्याचा ८२२ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. तसेच आमखास मैदान येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. शहरातून जाणाऱ्या खाम नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पासाठी बक्षीस घोषित केले आहे. शहराला स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट करण्याचे दिशेने महानगरपालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यात नागरिक सहभागही देत आहेत, याबाबत पालकमंत्री श्री. सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

देशाच्या एकतेचे प्रतिक तिरंगा

आपण सर्व हर घर तिरंगा/घरोघरी तिरंगा या अभियानात सहभागी झालात त्याबद्दल आपले अभिनंदन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेने जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता विसरुन सहभागी होतो. विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचे एकमेव उदाहरण असल्याचेही पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले.

प्रशासनाच्या विविध उपक्रमांचे कौतुक

पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनानेही जलसमृद्ध गाव अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत विहीर पुनर्भरणाची ५७० कामे तर रेनवॉटर हार्वेस्टिंगची १६७ कामे सुरु आहेत. वटवृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६०५ वटवृक्ष लागवड करण्यात आली आहे. या  अभियानांची सुरुवात करुन पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाकांक्षी काम सुरु केले आहे. पाणी टंचाईवर मात करण्याचा विचार यामागे आहे. प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या या उपक्रमांला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांची साथ असतेच. आपल्या समाजात एकोपा आणि शांतता कायम ठेवून आपल्या प्रगतीचा वेग राखता येईल. देशाची एकात्मता आणि शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना केले सन्मानित

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परविन यादव, पोलीस उपनिरिक्षक अशोक माने, दिपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले.

शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, यांना तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्चित संतोष दखर, अर्यान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या ॲटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्रा या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण १५३ पदांची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी ५९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित ९४नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ५ नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले.

श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here