78 वा भारतीय स्वातंत्रदिनानिमित्त मुख्य शासकिय ध्वजारोहण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

शासनाच्या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्हा प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि. 15 (जिमाका): शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून आज पालघर जिल्ह्यातील एकूण होत असलेल्या विकास कामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये आपला पालघर जिल्हा राज्यात एक प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्राच्या 78 वा मुख्य शासकिय ध्वजारोहन पालकमंत्री रव्रिद्रं चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी श्री. चव्हाण मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार श्रीनिवास वनगा, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, मुद्रांक जिल्हाधिकारी दिपक पाटील, तहसिलदार सचिन भालेराव तसेच वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, महाविद्यालयीन व शालेय विद्यर्थी व नागरीक उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तीन लाखापेक्षा अधिक भगिनींनी या योजनेसाठी अर्ज सादर केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आधार कार्ड बँकेशी संलग्न असलेल्या भगिनींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची 3 हजार रुपये इतकी रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.

महसूल विभागामार्फत दिनांक 1 ऑगस्ट पासून ‘महसूल पंधरवडा 2024’ साजरा करण्यात आलेला असून दिनांक 1 ते 15 ऑगस्ट या दरम्यान महसूल विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, महसूल जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा, महसूल अधिकारी /कर्मचारी यांचे प्रशिक्षण, महसूल पंधरवडा वार्तालाप इत्यादी उपक्रमांचा समावेश महसुल पंधरवडा मध्ये करण्यात आला.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नि:शुल्कपणे कार्यान्वित करण्यात आलेली असून जिल्हा प्रशासनामार्फत 3000 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यांना याबद्दल विद्यावेतन देखील अदा करण्यात येणार आहे. तरी नोंदणीकृत उमेदवार शासकीय/ निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधील रिक्त जागांकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इच्छुकांनी अर्ज सादर करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (मृगबहार) चिकू करिता सन 2023-24 मध्ये 254 शेतकऱ्यांच्या खात्यावर 126.44 लाख अनुदान जमा करण्यात आलेले आहे. याशिवाय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये जिल्ह्यातील 64 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून रुपये 1 कोटी 28 लाख विमा अनुदान शेतकऱ्यांच्या वारसांना व कुटुंबियांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा 2006 अन्वये जिल्ह्यामध्ये 51 हजार 649 वैयक्तिक तसेच 496 सामूहिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले असून संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो.

आपल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातून अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत व प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून मिशन लक्ष्यवेध मोहीम, शालेय क्रीडा स्पर्धा, रोडरेस, उन्हाळी क्रीडा स्पर्धा, सद्भावना दौड, मास्टर्स ट्रेनिंग इत्यादी क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आधुनिक दर्जाची व्यायामशाळा तसेच क्रिडांगणे तयार करण्यासाठी सर्वसाधारण, आदिवासी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत ग्रामीण स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याशिवाय जिल्हा क्रीडा संकुल निर्मितीसाठी 16 एकर जमिनीवर 400 मीटरच्या आधुनिक सिंथेटिक ट्रॅकसह जलतरण तलाव, मल्टीपर्पज हॉल, क्रीडा वसतीगृह आणि विविध खेळांच्या अद्ययावत क्रिडांगणांनी युक्त असा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचा लाभ जिल्ह्यातील सर्वच प्रतिभावान खेळाडूंना होणार आहे. भविष्यात पालघरसारख्या प्रगतशील जिल्ह्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील असा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना धनादेशाचे वाटप पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कारही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मनोर-वाडा राज्यमार्ग व वाडा भिवंडी राज्यमार्ग यांचे रस्तादुरुस्ती काम मंजूर असून केंद्रीय मार्ग निधीमधून केळवा स्टेशन ते केळवा दांडा रोड रुंदीकरण, चिंचारे, रावते, बोरशेती, किराट, नागझरी, निहे, काटाळे, मासवण, धुकटण, बहाडोली, दहिसर रस्ता रुंदीकरण इत्यादी मंजूर कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात करण्यात येणार आहे.

याशिवाय डहाणू कासा जव्हार रस्ता सुधारणा करण्याचे काम नियोजित असून डहाणू ते चारोटी यादरम्यान देखील काँक्रिटीकरण करण्याच्या कामास पावसाळ्यानंतर सुरुवात करण्यात येईल.

याव्यतिरिक्त पालघर येथील शंभर खाटांच्या रुग्णालयाचे काम, विरार येथील 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम, ग्रामीण रुग्णालय खानिवडे येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थानाचे बांधकाम इत्यादी कामे मंजूर करण्यात आलेली असून नियोजित वैद्यकिय महाविद्यालय इमारतीचे बांधकाम देखील प्रस्तावित आहे.

केंद्र शासनाच्या डीएफसी प्रकल्पांतर्गत केंद्र व राज्य सरकार यांच्या 50% टक्के संयुक्त भागीदारीतून पाच उड्डाणपूलांची कामे प्रगतीपथावर आहेत. रेल्वे फाटक शिलोत्तर, रेल्वे उड्डाणपूल कोळगाव, रेल्वे फाटक वाणगाव, चिखले, घोलवड, बोर्डी इत्यादी कामे पूर्ण झालेली असून सर्व उड्डाणपूल वाहतुकीस खुले करण्यात आलेले आहेत तर उर्वरित पुलांपैकी जुचंद्र, नारिंगी-बोळींज, सफाळे व नवली यांची कामे 75 टक्के पूर्ण झालेली असून सर्व उड्डाणपूल डिसेंबर 24 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असलयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

सन 2024 च्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे मंजूर झालेली असून त्याकरिता 138.20 कोटी इतका निधी मंजूर झाला असून यामधील 6.83 कोटी पुलांकरिता मंजूर आहेत.

नाबार्ड अंतर्गत विभागाच्या अखत्यारीतील पालघर, डहाणू, तलासरी व वसई या तालुक्यातील सन 2023 -24 पासून एकूण 14 पुलांची कामे मंजूर असून 14 कामे प्रगतीपथावर आहेत. सदर पुलांमुळे औद्योगिक शहरांस जोडणे सोयीस्कर झाले आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत वडोदरा मुंबई द्रुतगती मार्ग हा दिल्ली मुंबई दृतगती मार्गाचा प्रकल्प सद्यस्थितीला प्रगतीपथावर असून हा प्रकल्प साधारणत: जुलै 2025 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतमालाची व औद्योगिक उत्पादनांची सुलभपणे ने-आण करण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे.

उद्या दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले असून या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व शासकीय विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार असून नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे व आपल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे असे आवाहनही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.