राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

0
10

मुंबई, दि. १७ : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचे राज्य आहे. राज्याच्या या समृद्ध परंपरेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. कोणत्याही समाज घटकाने कायदा हातात घेऊ नये. काही समस्या असल्यास त्या संवादाच्या माध्यमातून सोडविण्यात याव्यात. येत्या काळात विविध सण येत असून या सर्व उत्सवांमध्ये सर्व समाजांनी सहभागी होऊन ते आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपले सण हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रत्येक समुदायाने इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपले सण साजरे करावेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर देखील कडक नजर ठेवली जात असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवर त्वरित कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना एकजुटीने राहण्याचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here