शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन पाल्यांना सनदी अधिकारी बनवा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
14

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय महिला लाभार्थी सन्मान सोहळा संपन्न

 कोल्हापूर, दि.  १७ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक उन्नती साधावी तसेच आपल्या मुला, मुलींना उच्च शिक्षण देवून सनदी अधिकारी घडवावेत, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यस्तरीय महिला लाभार्थी सन्मान सोहळा पुण्यातील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सोहळा मार्केट यार्ड जवळील रामकृष्ण हॉलमध्ये हा सोहळा दूरदृश्य पद्धतीने पार पडला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना अभिनंदन प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लाभार्थी महिलांनी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांना राख्या बांधून या योजने प्रति असणाऱ्या कृतज्ञता भावना व्यक्त केल्या.

यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मान्यवर तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गेल्या दोन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत. त्यांच्या संसाराला ही छोटीशी मदत आहे. अद्याप आधार लिंकींग न झालेल्या आपले आधार कार्ड लिंक करुन घ्यावे. ही योजना बंद होणार नसून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा लाभही आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी खात्यात जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासनाच्यावतीने महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, गौरी गणपती सणामध्ये आनंदाचा शिधा, महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी तसेच सामुदायिक विवाह नोंदणीसाठी अनुदान, वर्षातून तीन सिलेंडर मोफत, महिला बचत गटांसाठी अनुदानात वाढ,  व्यवसाय करण्यास इच्छुक महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना अशा बऱ्याच योजना महिलांसाठी सुरु केल्या आहेत. शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन  सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, जिल्ह्यातील 7 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणेच रक्षाबंधनाआधीच ओवाळणी म्हणून प्रत्येक महिलेच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे. शासन महिलांच्या पाठीशी असून ही योजना निश्चितच सुरु राहणार असून या योजने पासून कोणीही वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व लाभार्थी महिलांचे स्वागत केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून ही योजना राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, सीआरपी, बचत गटाच्या महिला, ग्राम स्तरावरील यंत्रणेने खूप कष्ट घेतले आहेत. तसेच लाभार्थी महिलांनीही स्वतः नोंदणी केल्यामुळे यात आपला जिल्हा आघाडीवर होता. जिल्ह्यात 6 लाख 92 हजार 513 अर्ज मंजूर झाले असून बॅंकांमध्ये महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे, सर्व लाभार्थी महिला व नोंदणी होण्यासाठी काम केलेल्या यंत्रणेचे त्‍यांनी यावेळी आभार मानले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक बहीण माझी बहीण असा विचार करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी या योजनेची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली आहे. रक्षाबंधनाआधीच खात्यावर पैसे आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय.. भावानं जशी आम्हा बहिणींची आठवण ठेवली  तशीच आम्ही बहिणीही इथून पुढे साहेबांची आठवण ठेवणार.. , असा विश्वास या सोहळ्यात उपस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी व्यक्त केला.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here