चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

  • आमझरी पर्यटन संकुलला भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी संवाद
  •   ‘प्रकाश होम स्टेला भेट व पाहणी
  •   चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

अमरावती, दि. १६ : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने देशभरात नावलौकीक व्हावे तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन योजना व सी.एस.आर. फंड मधून निधी उपलब्ध करुन देणार, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील ‘आमझरी निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’ला पालकमंत्र्यांनी आज भेट ‍देऊन साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी रोजगार, कामकाज व साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली.‍ त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पंकज कुमावत, वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील ‍म्हणाले की, आमझरी येथील निसर्ग  पर्यटन संकुलात स्थानिक 20 युवक-युवतीव्दारे साहसी खेळ चालविण्यात येत असून त्यांना साधारणतः 10 हजार रुपये मानधन दिल्या जाते. अशाच पध्दतीने स्थानिकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून येथे उत्पादीत होणारे विशेष उत्पादन, तृणधान्य, खपली गहू, मध, खवा, मोहफुलावर प्रक्रीया करुन उत्पादन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आमझरी हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मधापासून निर्माण होणारे विविध उत्पादन तयार करुन विपणन केंद्र निर्माण करण्यात यावे. या अशा अनेक उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन मेळघाटातील ग्रामीण क्षेत्राचा विकास साधला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खटकाली येथील प्रकाश जाम्भेकर यांच्या  ‘प्रकाश होम स्टे’ ला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. होम स्टे ला येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास, भोजन व्यवस्था आदी संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथील कॉफी प्रकल्प व उत्पादनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी शहापूर येथील खादी व ग्रामोद्योग आयोगाव्दारे पुरस्कृत शिवस्फुर्ती प्रक्रीया फाउंडेशनला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्र्यांची चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

दरम्यान यावेळी पालकमत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून वैद्यकीय सोयी- सुविधांचा आढावा घेतला. हतरु गावात आलेल्या कॉलरा साथीच्या रुग्णांच्या प्रकृती विषयी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

चिखलदरा तालुक्यातील हतरु येथे काही दिवसापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. त्यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, गावातील रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु केले होते. भरती झालेल्या रुग्णांपैकी दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी यावेळी दिली.

०००