मुंबई, दि. 11 : पुणे येथे उपचार सुरु असलेल्या 2 कोरोनाबाधित प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांसोबतचे मुंबईतील २ सहप्रवासीदेखील आज कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. सध्या पुणे येथे १८ जण तर मुंबईत १५ जण भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान आज सकाळी आरोग्यमंत्र्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमण्यात येणार असून त्यामध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, गृह विभाग यांचे सचिव असतील, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुणे येथे कार्यान्वित असलेला नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणीवजागृती अधिक व्यापक करावी, अशा सूचना देतानाच यासाठी सर्व माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, डॉ.अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
दि.११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११९५ विमानांमधील १ लाख ३८ हजार ९६८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि द. कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६३५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३४९ प्रवाशांपैकी ३१२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेड्स उपलब्ध आहेत.
००००
अजय जाधव/विसंअ/11.3.2020