प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या सहअध्यक्षपदी पालकमंत्री शंभूराज देसाई

0
11

सातारा दि. २३ (जिमाका) –  प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यास शासनाने 19 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. या प्राधिकरणाचे सहअध्यक्ष म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या रचनेमध्ये यापूर्वीच 10 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या प्राधिकरण समितीच्या रचनेचा विस्तार करण्यात आला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आला आहे. तर विजय दत्तात्रय नायडू, यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची कार्यकक्षा व अधिकार कक्षेमध्ये प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन आराखड्यातील शासनाने मंजूर केलेल्या कामांच्या अंदाजपत्रकांना व नकाशांना मान्यता देणे,  प्राप्त निधी/आर्थिक स्त्रोताचे वाटप करणे, प्रतापगड किल्ला विकासाच्या मान्यता दिलेल्या आराखड्याप्रमाणे सदरील आराखड्या अंतर्गत निधीचे पुनर्वाटप व पुनर्रचना करणे, प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या कामांच्या प्रगतीचे संनियंत्रण करणे, प्रकल्पांतर्गत निर्माण केलेले विविध घटक कार्यान्वित करणे याबाबींचा समावेश आहे.
नियोजन विभागामार्फत मंजूर होणारा आराखडा, जिल्हा नियोजन समिती इ. माध्यमातून प्राधिकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे विकासाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत रु 381.56 कोटी रक्कमेच्या आराखड्यास मंजुरी दिलेली आहे. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन संबधातील कामकाज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण पाहणार आहे.
०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here