मुंबई, दि. 11 : अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजेनेचे सुरु असलेले काम अधिक गतीने करण्यात यावे याकरिता मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.
यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह मृद व जलसंधारण, वने आणि विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री.गडाख म्हणाले, अवर्षणप्रवण कर्जत तालुक्यातील 19 गावांचा पिण्याचा पाण्यासाठी लघु पाटबंधारे प्रकल्प व 24 पाझर तलावांना, कुकडी कालव्यामधून पाणी उपसा करताना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे भरुन देण्याचे प्रयोजन तुकाई उपसा सिंचन योजनेतून करण्यात येणार आहे. या योजनेत सुरु असलेले काम अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या मंजुरी घेऊन काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.
तुकाई उपसा सिंचन योजनेमुळे कर्जत तालुक्यातील 19 गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेत एकूण 599 हेक्टर लाभक्षेत्र असणार आहे. 115 द.ल.घ.फूट पाणी वापर धरणस्थळी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.गडाख म्हणाले, तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर वीज बिलाचा प्रश्न भविष्यात उद्भवून ही योजना कायान्वित करणे अडचणीचे ठरु शकते. याकरिता पथदर्शी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सौरउर्जेद्वारे वीजनिर्मिती करत व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या योजनेसाठी आवश्यक असलेली वीजेची गरज भागविण्यासाठी सोलर जनरेशनची तरतूद करावी. या सोलर प्रकल्पासाठी बिटकेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गायरान जमीन उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००
राजू धोत्रे/वि.सं.अ./11/03/2020