मुख्य आयुक्तांसह सर्व राज्य सेवा हक्क आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्याने पारित केलेला व सामान्य जनतेला विविध प्रकारच्या सेवा पारदर्शी पद्धतीने व कालमर्यादेत देणारा लोकसेवा हक्क कायदा अत्यंत क्रांतिकारी आहे. अशा प्रकारचा जनहिताचा कायदा अनेक राज्यांनी केला असला तरीही महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत आहे ही अभिमानास्पद बाब असून सामान्य जनतेला सेवा देण्यासाठी सुरु केलेले ‘आपले सरकार’ पोर्टल अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यातील सर्व विभागीय राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांसह आज राज्यपालांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
राज्यात लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याची तरतूद कायद्यात असल्याची दखल घेऊन संबंधित तरतुदीची अंमलबजावणी करण्याची सूचना देखील आपण सरकारला करू असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
आपले सरकार पोर्टल २०१५ मध्ये तयार केले असून ते अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. त्यामुळे आपला अर्ज नेमका कुठे आहे याची माहिती जनतेला मोबाईलवरून देखील अचूक मिळू शकेल. भारत सरकार देखील राज्य सेवाहक्क कायद्याप्रमाणे केंद्र शासनाच्या सेवा जनतेला विनाविलंब उपलब्ध करून देण्याबद्दल कायदा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडे आयोगाच्या स्थापनेपासून प्राप्त अर्जांपैकी ९५ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीवास्तव यांनी राज्यपालांना आयोगाच्या २०२२-२३ मध्ये विधानमंडळाला सादर केलेल्या अहवालाची प्रत सादर केली.
यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे (पुणे), बलदेव सिंह (कोकण), अभय यावलकर (नागपूर), डॉ. किरण जाधव (छत्रपती संभाजीनगर), डॉ. नारुकुला रामबाबू (अमरावती), चित्रा कुलकर्णी (नाशिक) तसेच सेवा हक्क आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००