मुंबई, दि. ३० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट तालुका मालवण, येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याबाबत वाव, संकल्पना, कार्यपद्धती निश्चितीसाठी समिती गठीत करण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
ही समिती मनीषा पाटणकर-म्हैसकर, अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून सदाशिव साळुंखे, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय हे समितीचे सदस्य सचिव आहेत. तर समिती सदस्यांमध्ये कमोडोर एम. दोराईबाबू, भारतीय नौदलाचे प्रतिनिधी , तसेच प्रा. जांगीड, आय.आय.टी.मुंबई, प्रा. परीदा, आय.आय. टी., मुंबई, राजीव मिश्रा, संचालक, जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, मुंबई, राजे रघुजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व मराठा आरमाराचे (Navy) अभ्यासक, यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तर इतिहासकार जयसिंगराव पवार, हे विशेष निमंत्रित असून इतर विशेष निमंत्रित समितीत असणार आहेत.
किल्ले राजकोट, ता. मालवण, जि.सिंधुदूर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाचा वाव, संकल्पना व कार्यपद्धती निश्चितीसाठी समितीने शिफारशी करावयाच्या आहेत.
०००
वंदना थोरात/विसंअ