नांदेड दि. 2 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले आहे.
नांदेड मधील अतिवृष्टीच्या संदर्भात आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील 93 मंडळापैकी 65 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. सध्या पाऊस सुरू आहे.मात्र पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे, असे त्यांनी निर्देश दिले आहे.
महानगरपालिका आयुक्तांशी देखील त्यांनी शहरातील नुकसानाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले असून शासनामार्फत नुकसानीची तातडीची जी मदत आहे ती लवकरात लवकर नागरिकांना मिळेल याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देशित केले आहे. नांदेड शहरात काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले आहे. अशा घरातील रहिवाशांना देय असलेली योग्य ती मदत शासनामार्फत तात्काळ उपलब्ध करून दिली जावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रकल्पांचा देखील त्यांनी आढावा आज घेतला. पाटबंधारे विभागाने पाण्याचा निचरा करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क करावे. गोदावरी पात्राच्या वरील भागात देखील आपण संपर्क साधला असून तेलंगाना राज्यासोबतही वाररूम मधून यंत्रणा संपर्क साधून आहे. शक्यतो पुराचा फटका नागरिकांना बसणार नाही या पद्धतीने पाण्याची नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000