श्री गणरायाचे आगमन आनंद, समृद्धी – समाधानाचे पर्व घेऊन येवो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६:  श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बाप्पा चरणी केली आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणतात की, श्री गणेशाचे आगमन दरवर्षी एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणून जगाचेही महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. श्री गणेशाला कलाधिपती मानले जाते. त्यामुळे या उत्सव काळात कलाविष्कारालाही उधाण येतं. महाराष्ट्राचा काना कोपरा अशा अविष्कारांनी, उत्साह-जोश यांनी ओसंडून जातो. यंदाही आपण हा उत्सव उत्साहात, जल्लोषात आणि पावित्र्य राखून साजरा करूया. श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊया. उत्सव ही संधी मानून आपण समाजातील गरजूंपर्यंत पोहचून, त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया.

श्रीगणेश आपल्याला निसर्ग पूजनाचा संदेश देतात. आपणही पर्यावरणाची काळजी घेऊया. निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांना पाठबळ देऊया. निसर्गाचं जतन-संवर्धन होईल, अशा प्रयत्नांत सहभागी होऊया. सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे श्री गणेशाकडून सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा घेऊन राज्यातील सामाजिक सलोखा-बंधुभाव परस्परांतील प्रेम-आदर भाव वाढीस लागेल, असे प्रयत्न करुया.

आपला महाराष्ट्र भारताचे ‘ग्रोथ इंजिन’ आहेच. श्रीगणेशाच्या कृपेनं आपला महाराष्ट्र विकसित भारताचेही नेतृत्व करेल, यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया. श्री गणरायाचे आगमन महाराष्ट्रातील घरा-घरात सुख, समृद्धी घेऊन येईल. कुटुंबातील सगळ्यांच्या इच्छा-आशा-आकांक्षा पूर्ण करेल. विघ्नहर्त्याचं आगमन निसर्गाची अवकृपा, आणि अन्य सगळी विघ्न दूर करेल. श्री गणेशाचं अखंड कृपाछत्र कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे,अशी मनोकामना करून, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

०००