मुंबई, दि.९ : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, दि. १ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली या एकमेव जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ३१% कमी पाऊस झाला आहे.२५ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ७९% आणि ७२% इतका जास्त पाऊस झाला असून, हे दोन जिल्हे सामान्य सरासरी पर्जन्यमानापेक्षा सर्वात जास्त विचलन असलेले जिल्हे आहेत.
इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २०% ते ५९% जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये ५९% जास्त अतिवृष्टीसह लातूर जिल्ह्याचा समावेश आहे, ५५% जास्त अतिवृष्टीसह पुणे जिल्ह्याचा समावेश आहे, ५०% जास्त अतिवृष्टीसह जळगाव, ४८% जास्त अतिवृष्टीसह नाशिक आणि बीड, ४७% जास्त अतिवृष्टीसह धुळे, ४६% जास्त अतिवृष्टीसह कोल्हापूर, ४५% जास्त अतिवृष्टीसह परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे.
०००
संध्या गरवारे/विसंअ