राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जाणून घेतल्या विविध घटकांच्या अपेक्षा व संकल्पना

0
19

छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका): राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी जिल्ह्यातील व मराठवाड्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच विविध घटकांकडून विकास विषयक अपेक्षा व संकल्पना जाणून घेतल्या.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात सुभेदारी अतिथी गृह येथे विविध राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटक आदींशी चर्चा केली. राज्यपाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे,  माजी खासदार इम्तियाज जलीलआदी  मान्यवर उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर मांडण्यात आलेल्या विषयांत प्रामुख्याने पाण्याचे समन्यायी वाटप, समतोल विकास, वैधानिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन यासारखे प्रमुख विषय मांडण्यात आले. तसेच उद्योग विकासासाठी पायाभुत सुविधा विकास, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास यासारखे विषय मांडण्यात आले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि बीड यांच्या विकासासाठी विशेषत्वाने उपाययोजना करण्याबाबतही विषय मांडण्यात आले.

राज्यपाल श्री.  राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here