आगामी १०० वर्षांचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
26

खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

पुणे, दि. १२: नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करण्याकरिता शासन कटिबद्ध आहे; त्यादृष्टीने आगामी १०० वर्षांचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा, याकरिता लागणारा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सत्यशील राजगुरु, प्रशांत राजगुरु आदी उपस्थित होते.

श्री. पवार यांच्या हस्ते चांडोली ते हुतात्मा राजगुरुवाडा स्मारक पूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगुरूनगर शहरातील मुख्य रस्ता वाडारोडचे लोकार्पण तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरु वाडा स्मारक, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कडूस खेड गुळाणी वाफेगाव लोणी रस्ता सुधारणा करणे, आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.

श्री. पवार म्हणाले, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासाकरीता १०४ कोटी १२ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. स्मारक आणि परिसरातील विकास कामे करताना नदीचा विचार करुन कामे करावीत. याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही. नवीन प्रशासकीय इमारत तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ या राजगुरूनगरच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तू आहेत, याची दक्षता घेऊनच कामे करावीत. सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ करण्यासह वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, तालुक्यातील सार्वजनिक कामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु वाडा स्मारकाचे भूमिपूजन

पुरातत्व विभागामार्फत विकसित करण्यात येणार असून १०४ कोटी १२ लाख रुपये खर्चाच्या आराखड्यास मान्यता मिळाली असून यापैकी ३६ कोटी ४१ लाख रुपयाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यामध्ये जन्मखोली, थोरला वाडा, मुख्य दरवाजा  व स्मारकाचा जीर्णोधार, स्मारकातील वाचनालय, कॅफेटेरिया तसेच रामघाट, चांदोली घाट, त्याकडे जाणारा दरवाजा व पायऱ्या, संरक्षित भिंत, वाहनतळ, पदपथ, अंतर्गत रस्ते, जमीन सौंदर्यीकरण (लॅंडस्केप), खुले सभागृह, पुतळे, शिल्पे (म्युरल्स), संपूर्ण स्मारकाचे विद्युतीकरण, प्रकाश व ध्वनी सादरीकरण (लाईट ॲण्ड साऊंड शो) आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण जागेचे क्षेत्रफळ ३ हजार ८२४.६० क्षेत्रफळ आहे. या कामासाठी २१ कोटी ८० लाख ७५ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उप कोषागार कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग,उप अभियंता सार्वजकिन बांधकाम विभाग, निरीक्षक वैधमापन, उपनिबंधक कार्यालय, लेखा परीक्षक कार्यालय आदी शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. बहुतांश कार्यालयास शासकीय जागा उपलब्ध नसल्याने भाड्याच्या जागेत आहेत तसेच महसूल विभागाच्या कार्यालयास अस्तित्वातील इमारती कमी पडत असून त्या जीर्ण व नादुरुस्त इमारती झाल्या आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाल्यास सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येणार असून प्रशासकीय कामात गतिमानता येण्यास मदत होईल.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

बॉश चेसिस सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण यांनी बॉश सोशल एंगेजमेंट इनिशिएटिव्ह अंतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून एकूण ७ हजार १३५ चौरस मीटर क्षेत्रफळात अत्याधुनिक नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याकरीता ५ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. परिसराचा विचार करता आवश्यक वैद्यकीय तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सर्व सोयीयुक्त प्रसुती कक्ष, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा सुविधा, अत्याधुनिक सुविधायुक्त शस्त्रक्रिया गृहसुविधा, १५ प्रवासी वाहन क्षमता असलेली उद्धवाहन सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

चांडोली ते हुतात्मा राजगुरुवाडा स्मारक पुलाचे लोकार्पण

मौजे चांडोली ते हुतात्मा राजगुरुवाडा दरम्यान भीमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. या कामाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण तर दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. या पुलाचे बांधकामामुळे चांडोली गाव, राजगुरूनगर शहर व बाजारपेठ हे प्रमुख जिल्हा मार्ग १५ सोबत जोडले जाणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पूलामुळे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेला राजगुरूवाडा मुख्य रस्त्याची जोडला जाणार असल्याने येथील पर्यटनास चालना मिळणार आहे.

कडुस खेड गुळाणी वाफेगाव लोणी रस्ता सुधारित कामाचे भूमिपूजन

कडुस खेड गुळाणी वाफेगाव लोणी दरम्यान ३०. २० किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना लाभ होणार असून त्यांचा वेळ व इंधनात बचत होणार आहे.

आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे पुलाचे भूमिपूजन

आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम झाल्यानंतर भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक तसेच इतर वाहतुकीस खेड शहरात न जाता प्रमुख जिल्हा मार्ग १५ मार्गे रा.मा राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पूलाच्या बाजूच्या ग्रामीण भाग मुख्य रस्त्याशी जोडला जाऊन या भागाच्या विकासास चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here