मुंबई, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीच, मुंबई येथे राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.
दलामल हाऊस, नरीमन पाँईंट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस निमित्ताने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
श्री. दराडे म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत सर्व १३ किनारी राज्यांमध्ये २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस) समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत दि. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीच, मुंबई येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा, स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वायाने कामे करावे, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.
यावेळी विविध यंत्रणांचे आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
राजू धोत्रे/विसंअ/