बारामती, दि. १५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली; क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री.पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळोची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, फळे व भाजी हाताळणी केंद्र, मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच क्रीडा संकुल नूतन इमारत, रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, गरुडबाग येथील कॅनॉलचे सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.
यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित होते
क्रीडा संकुलात मॅट फिनिशिंग असलेल्या फरशा बसवा. भिंतीच्या रंगानुसार कक्ष, कक्षातील सोफा, शौचालय आदी बाबींचा विचार करुन इलेक्ट्रिकल उपकरणे वापरावीत. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन कामे करा.
जळोची उपबाजार येथील फळे व भाजी हाताळणी केंद्राच्या परिसरात सरळ वाढणारी, सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. कृषी उत्पन्न बाजार समिती नुतन इमारतीच्या परिसरातील रस्त्याचा विचार करुन पुरेशा उंचीच्या संरक्षक भिंती उभाराव्यात. परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करावी.
कन्हेरी वनविभागात विविध प्रजातींचे वृक्षारोपण करा. यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन झाले पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. परिसरात फिरतांना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच गरुडबाग येथील कॅनॉलचे सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम करतांना समोरील मुख्य रस्त्यापेक्षा उंच जोत्याचे बांधकाम करावे.
परिसरातील विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. कोणतीही कामं प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आदी उपस्थित होते.
०००