केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
नागपूर, दि. १६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वेचा कायापालट करण्यात येत आहे. देशातील विविध भागातून सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस हा या उपक्रमाचा एक भाग आहे. कुठल्याही देशाच्या सर्वांगीण विकासात सार्वजनिक वाहतूक मार्गांचा विकास मोलाचा ठरत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद येथून देशातील सहा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यात नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर संत्रा मार्केट पश्चिमीद्वार येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी आमदार कृपाल तुमाने, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा, मंडळ रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यावेळी उपस्थित होते.
नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे. विशेषतःरेल्वे प्रवाशांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. देशातील इतर भागाची नागपूर शहराशी कनेक्टिवीटी वाढल्यास नागपूर व परिसराचा विकास होण्यास मदत होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे देशविकासात मोलाची भूमिका बजावत असते. रस्ते, रेल्वे आणि विमान या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा यात समावेश आहे. नागपुरातून दक्षिणेकडे जाणाऱ्या अधिक रेल्वे सुरू होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारत ट्रेन मोलाची – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी, ही या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. आज या मागणीला मूर्त रूप आले आहे. मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारतची ट्रेन ही मोलाची उपलब्धी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, नागपूर व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक विकास व्हावा, असा प्रयत्न आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले.
०००