आरल निवकणेच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध जमीन दाखवणे त्वरीत सुरु करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

0
35

सातारा  दि. १९ (जिमाका):   पाटण तालुक्यातील आरल निवकणे प्रकल्पग्रस्तांची कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी असून या निवकणे गावच्या ४२ पात्र  प्रकल्पग्रस्तांसाठी पाटण तालुक्यातच नजीकच्या गावांमध्ये जागेचा शोध घेऊन प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी. अन्य प्रकल्पांमधील शिल्लक जमीन दाखवण्याचा कार्यक्रम पुढील चार दिवसांमध्ये लावावा त्यासाठी तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा. ज्यांना जमीन पसंत पडेल त्यांना जमीन देण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे,  एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. चामलवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत एकूण 301 खातेदार असून पुनर्वसन पर्यायी जमिन देय खातेदार 157 इतके आहेत. त्यापैकी निवकणे गावच्या ४२ खातेदारांना पुनर्वसनाची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने कामे तात्काळ सुरु करा

पाटण तालुक्यात 2021 मध्ये अतिवृष्टी मुळे दरड कोसळून बाधित गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत एमएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गावांमधील अनुषांगिक कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

भूस्खलनामुळे पाटण तालुक्यातील जितकर वाडी (जिंती), शिदृकवाडी, काहीर, आंबेघर (खा), आंबेघर (वरचे), ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी (हुम्बरली), हुंबरळी या गावांचा समावेश आहे. या गावांमधील 499 कुटुंब संख्या आहे. कायमस्वरुपी पुनर्वसनाबाबत चर्चा करताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी एमएमआरडीए व सार्वजनिक बांधकम विभाग यांनी या अनुषंगाने तात्काळ कामे सुरु करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी मौजे मरळी ता. पाटण येथील जल जीवन मिशन कामाचाही आढावा घेतला. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक असून त्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here