बुद्धी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करून ठाणे जिल्ह्याचा होणार सर्वांगीण विकास – प्रवीणसिंह परदेशी

ठाणे विकास परिषद-२०२४

ठाणे,दि.१९ (जिमाका): विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे ‘ठाणे विकास परिषद-2024’ चे उद्दिष्ट असणार आहे. बुद्धी आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा कल्पकतेने वापर करुन ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा केला जात आहे, असे प्रतिपादन ‘मित्रा’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी आज येथे केले.

“मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन” च्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या महानगरपालिका तर अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग आणि पालघर या नगरपरिषदा येतात. नीती आयोगाच्या अहवालानुसार “एम.एम.आर. जागतिक आर्थिक केंद्र” बनविण्याच्या दृष्टीने एमएमआर क्षेत्रांमध्ये सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या पाच क्षेत्रांना केंद्र बिंदू मानून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार “जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि मित्रा” यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वा. या वेळेत  “MMR Development Conference-2024” अंतर्गत “ठाणे विकास परिषद-2024” चे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची आढावा बैठक माजी मुख्य सचिव तथा “मित्रा” चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, “मित्रा” चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूराणी जाखड, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रशांत रोडे, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष भालचंद्र रावराणे, प्रसिध्द निर्माता-अभिनेता मंगेश देसाई व विविध कार्यालयांचे कार्यालयप्रमुख यांची उपस्थिती होती.

श्री.परदेशी म्हणाले की, ठाणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपले नेमके ध्येय काय, याबाबत विचारपूर्वक ध्येयनिश्चिती करणे आवश्यक आहे. ही ध्येयनिश्चिती झाल्यानंतर नेमकी अडचण काय आहे, कुठे त्रुटी आहेत, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, याचा सर्व दृष्टीने विचार करून त्यावरील उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी ही विकास परिषद घेण्यात येणार आहे. प्रदूषणरहित शहर, सुटसुटीत वाहतुकीचे नियोजन, मेट्रोचे जाळे वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, खाडी-समुद्रातील पाण्याचे शुद्धीकरण, स्वच्छता याबाबतचे नियोजन, पाणीपुरवठ्याचे नियोजन, सांडपाण्यावरील प्रक्रिया, या प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर अशा विविध विषयांवरील सखोल अभ्यासातून विकास प्रक्रिया राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाय यासाठी या विकास परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक आश्वासक चर्चाविनिमय आणि पुढील काही वर्षात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात ठाणे शहर निश्चितच बदलणार आहे.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रोडे, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष भालचंद्र रावराणे, प्रसिध्द निर्माता-अभिनेता मंगेश देसाई आदींनी विविध विषयांवरील सादरीकरण केले.

०००