माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास २४ तास परवानगी द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 23 :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी  परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

मेट्रोचे काम सुरु असताना वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

00000

नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ/