मुंबई, दि. २३ : वेगवान अंमलबजावणीसाठी शबरी घरकुल योजनेचे शहरी भागातील लक्ष्यांक लवकर ठरवावेत, अशी सूचना आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला केली. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. तसेच केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतीने पोहोचविण्यासाठी योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत अशी सूचनाही त्यांनी केली.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विविध समस्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव वि.फ. वसावे, सहसचिव मच्छिंद्र शेळके उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आदिवासी तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये डिक्की च्या धर्तीवर ट्रायबल इंडस्ट्रियल झोनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन आदिवासी समाजातील नवउद्योजकांना चालना मिळेल. त्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार व धुळे या चार जिल्ह्यांची प्रथम निवड करण्यात यावी अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या देखरेखीकरिता स्वतंत्र देखरेख समिती निर्माण करावी, ज्यावरचे अशासकीय सदस्य शक्यतो आदिवासी समाजातूनच नियुक्त करावेत अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली. या समितीच्या देखरेखीमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये विविध योजना योग्य पद्धतीने व वेगाने राबविता येतील असे ते म्हणाले.
ग्रामीण भागातील अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल कसे करता येईल याबाबत ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शबरी वित्त व विकास महामंडळाच्या स्वयं रोजगाराच्या कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. या योजनांच्या अटी शर्ती मध्ये बदल करण्यासाठी समिती गठीत करावी. कौशल्य विषयक प्रशिक्षण जास्तीत जास्त युवकांना कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावे.आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवाव्यात. आश्रमशाळेतील मुलांना खेळांचे प्रशिक्षण देण्यात यावे.आश्रमशाळा व वसतीगृह स्तरावर अद्यावत सुविधा देण्यात याव्यात या सुविधा मिळाल्या की नाही याची खात्री करावी.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर देण्यात यावे, असे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.
****
शैलजा पाटील/विसंअ/