मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ई-टेक्सटाईल’ प्रणालीचे अनावरण

वस्त्रोद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,  दि. २४ : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘ई-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या  ‘ई-टेक्सटाईल’ प्रणालीचे अनावरण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याचे नवीन एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरिता एण्ड टू एण्ड प्रोसेस ॲटोमेशन (end to end Process Automation) करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे. सहज व सुलभ व्यवसायाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातील सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत ‘ई-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागाचे सचिव श्री. सिंह यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. याप्रसंगी वस्त्रोद्योग विभागाचे उप सचिव श्रीकृष्ण पवार, आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000