नागपूर,दि. 29: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे, ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे, यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळापासून आग्रही होतो. विरोधी पक्ष नेता असतांना यासाठी पुन्हा आपण लढा दिला. तेव्हा रहिवासीयांना फार कमी जागा या दर्शविल्या गेल्या होत्या. रेडीरेकनरचे दर कमी करुन तत्कालीन शासनाने अन्याय केला. मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर स्थानिकांच्या या अन्यायाला दूर करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले. शिवणगाव वासियांना जो शब्द दिला होता त्याची पुर्तता करता आली याचे आज समाधान आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवणगाव येथील समाज भवनात आयोजित भूखंड वितरण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, स्थानिक पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थितीत होती.
कोणत्याही प्रकल्पासाठी जागा घेतांना रेडीरेकनरचे दर कमी करुन जागा घेणे हे कोणत्याच कायद्यात बसणारे नव्हते. यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागला. या लढयात आपल्याला यश मिळाले. त्यामुळेच शिवणगाव मधील अनेकांना त्यांच्या जमीनीचा कोट्यावधी रुपयांच्या घरात मोबदला मिळाला. अनेकांना आजच्या घडीला कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असेलेले प्लाट मिळाले, याचा मला मनस्वी आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी यासाठी महसूल विभागाशी संबंधित कामे लवकर पूर्ण केल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
न्यायाच्या प्रतीक्षेत शिवणगावातील लोकांनी अत्यंत संयमी व जबाबदार नागरिकत्वाचा प्रत्यय दिला आहे. केवळ विदर्भच नव्हे तर भारताच्या गौरवात भर पाडणारे, विदर्भातील व्यवसायाला, उद्योग जगताला, कृषी क्षेत्राला गती देणाऱ्या विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. आता या प्रकल्पातुन अनेक क्षेत्रात नवनवीन रोजगाराच्या संधी वाढणार असून स्थानिकांना चांगली संधी मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भोयर यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवणगाव येथील बबनराव महाले, सागर, संजय, अजय, सुरेश, गजानन महाले, प्रविण वरणकर, संदीप वरणकर , शेषराव शहाणे, दशरथ शहाणे, रामचंद्र शहाणे, राजेंद्र नितनवरे, कविता भोंगाडे, पाडुरंग देशमुख, सरस्वताबाई ठाकरे, निर्मलाबाई ठाकरे, अशोक ठाकरे, सुनिल ठाकरे, रंगराव ठाकरे, शकुंतला, अतुल, अमोल ठाकरे, सुनिल झलके, सविता झलके, अशोक नेवारे, देवराव डेंगे, रमेश डेंगे, सुधाभाई डेंगे आदींना प्रातिनिधीक स्वरुपात भूखंडाचे आवंटनपत्र बहाल करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे कामगारांना कीट वाटप करण्यात आले. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.