आयुष उपचार प्रणालीमुळे वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात जगात भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

0
53

मुंबई, दि. ३० : भारताचा वैद्यकीय पर्यटनाचा दृष्टीकोन केवळ शारीरिक उपचारांपुरता मर्यादित नाही, तर त्यात मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे. आयुष प्रणालीमुळे भारताला जगभरातील वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात एक विशेष स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले,  लवकरच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आयुषच्या १७० हून अधिक आजारांवरील उपचाराच्या पॅकेजेसचा समावेश करण्यात येणार आहे. मंडळ,  तहसील स्तरावर आयुष औषध केंद्रे उघडण्यात येणार आहे. यामुळे  आयुर्वेदासह आयुषच्या सर्व यंत्रणांची सर्व औषधे एकाच ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध होतील. सर्वप्रथम आयुष जन औषधी केंद्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, दिल्ली उघडण्यात येणार आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हॉटेल सेफिटेलला आयोजित ‘आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल’ संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय आयुष विभागाचे सचिव राजेश  कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनचे अध्यक्ष देवेंद्र त्रिगुणा, आयुष विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, पश्चिम विभागातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, भारताची नैसर्गिक विविधता स्वतःच अद्वितीय आहे. या विविधतेमध्ये वसलेली आयुर्वेद वैद्यकीय केंद्रे आणि शांततापूर्ण योग आश्रम शतकानुशतके विविध रूची असलेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करत आहेत. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) च्या सर्वांगीण पद्धती निरोगी पर्यटनाच्या तत्त्वांशी परिपूर्ण सुसंगत आहेत, ज्यामुळे जगभरात असलेल्या भारतातील अभ्यागतांना एक प्रामाणिक आणि समृद्ध अनुभव मिळतो.  रोगांच्या सर्वांगीण उपचारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, सर्वसमावेशक आणि कायमस्वरूपी उपाय शोधणाऱ्या लोकांसाठी आयुष प्रणाली आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

दरवर्षी अमेरिका, युरोप, रशिया, युरेशियन देश, मध्य पूर्व आणि इतर प्रदेशातून हजारो परदेशी पर्यटक आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेण्यासाठी भारतात येतात. आयुष वैद्यकीय प्रणालींची मागणी गेल्या दशकात अनेक पटींनी वाढली आहे, परिणामी अनेक रुग्णालयांनी त्यांच्या वैद्यकीय चौकटीत आयुर्वेद आणि आयुष सेवांचा समावेश केला आहे. आयुष सेवा आणि त्यांची मानके सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारत सरकारने धनत्रयोदशी हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे. या वर्षी आयुर्वेद दिनाचे ९ वे वर्ष आहे आणि त्याची संकल्पना “जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना” आहे, या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचे म्हणजेच शारीरिक आणि मानसिक रचनेचे आयुर्वेदिक शास्त्रीय विश्लेषण करण्याच्या उद्देशाने सरकारने देशभरात “देश का प्रकृती परिक्षण ” मोहीम सुरू केली आहे. भारताने पारंपरिक प्रणालींना आधुनिक वैद्यकासोबत जोडण्यात यश मिळविले आहे, ज्यातून इतर देशांनाही प्रेरणा मिळू शकते आणि हे मॉडेल स्वीकारले जाऊ शकते, जे जगभरातील आरोग्य सेवांमध्ये क्रांती घडवू शकत असल्याचा विश्वासही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री.  जाधव यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला आयुष मंत्रालय व आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here