मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम नवीन दिमाखदार स्वरूपात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन जनतेच्या भेटीला येत आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
उदंड प्रतिसाद लाभलेल्या ‘जय महाराष्ट्र‘चे जनतेच्या मनात आगळेवेगळे स्थान
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाने मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असून या कार्यक्रमाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, संबंधित क्षेत्रातील अभ्यासक व विचारवंत यांच्या मुलाखती प्रसारित करण्यात येतात. आताही या कार्यक्रमात नवीन स्वरूपात विविध विषयांवरील मुलाखती व संवाद सादर करण्यात येणार आहेत.
विकसित महाराष्ट्राबाबत मुख्य सचिवांनी मांडले विचार
राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेत आहे. हे निर्णय विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक निर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात जनतेशी संवाद साधला आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ८ वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
—- 000 —-
केशव करंदीकर/विसंअ/