लातूर, दि. ०१ : जळकोट येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत आणि शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचेही लोकार्पण त्यांनी केले.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी. एस. पांढरे, अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे, जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तहसील कार्यालयाच्या बाजूला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे १४ कोटी ८९ लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या या इमारतीचे सुमारे ५ हजार ५०० चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये विविध शासकीय विभागांची तालुकास्तरीय कार्यालये असतील. एकाच इमारतीमध्ये विविध शासकीय विभागांची कार्यालये सुरु झाल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
जळकोट येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी लोकार्पण केले. दोन मजली विश्रामगृह इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये तळ मजल्यावर एक व्हीआयपी कक्ष व इतर ४ कक्ष, भोजन कक्ष, पहिल्या मजल्यावर एक व्हीआयपी कक्ष व इतर २ कक्ष आणि १ सभागृह बांधण्यात आले आहे.