काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मालेगावातील कृषी विज्ञान संकुल कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार - पालकमंत्री दादाजी भुसे

0
78

नाशिक, दि. ४ (जिमाका) : काष्टी (तालुका मालेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.  छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभा बच्छाव आमदार किशोर दराडे, मंजुळताई गावित, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे. महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, कृषी  महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सचिन नांदगुडे, तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शुभेच्छा देतांना सांगितले की, राज्य शासनाच्या माध्यामातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येवून नागरिकांशी लवकरच संवाद साधू असेही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देतांना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे. तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार असून  विद्यार्थी, शेतकऱ्यांसह उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेल, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पालकमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत वर्ष २०२०-२१ मध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली. देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी ५ कृषी व संलग्न महाविद्यालय व १ कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे.या संकुलातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी ३०० विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.  एकूण १२०० ते १३०० विद्यार्थी एकाच वेळेच कृषी व सलग्न पदवीचे शिक्षण घेणार आहेत. संकुलात एकूण ५०० ते ६०० अधिकारी/कर्मचारी कार्यरत असणार आहेत. येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेवून यशस्वी होतील. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणे, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या अध्ययन करून कृषी विस्तार तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रचार प्रसार करणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडविणे. हाच कृषि विज्ञान संकुल स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. भविष्यात कृषी व संलग्न शाखांचे पदव्युत्तर पीएच.डी पदवी अभ्यासक्रम देखील या कृषी विज्ञान संकुलात सुरू करण्याचे प्रस्तापित करण्यात आलेले आहे.

नार-पार हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 7.50 हजार कोटींचा निधी प्रस्तावित आहे.

येणाऱ्या पाच ते सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.  मालेगाव शहरात महिला व बालकल्याण रूग्णालयाचे लोकार्पण झाले असून या रूग्णालयात 17 दिवसांत 312 महिला रूग्णांना उपचार देण्यात आले आहेत. मुंबई येथील रूग्णालयांच्या धर्तीवर या  रूग्णालयात उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. संजय गांधी निराधार योजनेचा शहरी व ग्रामीण भागातून 71 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. तसेच 20 हजार कामगारांना सुरक्षितेच्या दृष्टीने किटचे वाटप करण्यात आल आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1 हजार पेक्षा अधिक युवकांना नोकरीचे आदेश  प्रदान करण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलामध्ये विद्यार्थासाठीच्या सोयी-सुविधा

  • सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेले सुसज्ज वसतिगृह.
  • वसतिगृहामध्येच सहकारी तत्वावर भोजनालय
  • उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
  • आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वर्गखोल्या (Smart Classrooms)
  • विद्यार्थांना प्रत्येक विषयांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळा
  • अभ्यासासाठी सर्व विषयांचे पुस्तके उपलब्ध असलेले ग्रंथालय.
  • संपूर्ण परिसरात इंटरनेट सुविधा (Wi-Fi-Campus),
  • विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी २४ तास वाचन कक्ष
  • विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन.
  • प्रवेश घेतल्यानंतर ते पदवी पूर्ण होईपर्यंत एका प्राध्यापकाची विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक पदी नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच दैनंदिन अडचणी इत्यादी गोष्टींसाठी मार्गदर्शन
  • विद्यार्थ्यांसाठी क्रीड़ा स्पर्धांचे आयोजन.
  • उत्कृष्ट खेळाडूना भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी.
  • अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक सहलींचे / अभ्यास दौऱ्यांचे आयोजन.
  • विद्यार्थ्यांना विविध कृषि व पूरक उद्योग/ कंपन्यांना, कृषि प्रदर्शनांना भेटी देण्याचे आयोजन.
  • स्पर्धा परीक्षांच्या तयारी करीता व्याख्यानांचे आयोजन.
  • उद्योजकता व नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विशिष्ट कक्ष (Training and Placement Cell).
  • वार्षिक सांस्कृतिक स्नेह-संमेलन तसेच पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन,
  • विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी विवध विषयांच्या अतिथींची व्याख्याने.
  • विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यासाठी प्रक्षेत्राची सुविधा.
  • शेवटच्या वर्षातील विद्यार्थांसाठी ELP कार्यक्रम.
  • शेवटच्या वर्षातील विद्यार्थांसाठी प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम

विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यानंतर भविष्यातील करियर संधी:

  • पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवीचे शिक्षण घेऊ शकतात.
  • देशातील IIMs, IITs आणि केंद्र व विविध राज्यातील कृषी विद्यापीठ मध्ये उच्च शिक्षण.
  • कृषि क्षेत्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी/आचार्य शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठे, कृषी विभागातील विविध पदे, बँकिंग, पणन, स्थानिक स्वराज्य संस्था इ. तसेच कृषी व सलग्न क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एनजीओ खाजगी कंपन्या इ. ठिकाणी नोकरी करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
  • केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध प्रशासकीय विभागात वर्ग १ ते ३ मध्ये नोकरीच्या संधी.
  • खासगी कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी.
  • कृषीचे शिक्षण घेऊन विद्यार्थी शेतीपूरक विविध व्यवसाय सुरू करू शकतात.
  • परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलामध्ये शेतकरी बांधवांसाठी सोयी-सुविधा व त्या माध्यमातून होणारा फायदा:

उत्तर महाराष्ट्रातीत नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार इ. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळपिके व इतर भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, केळी, तसेच कापूस हे महत्त्वाचे पिके आहेत. या सर्व पिकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्रीचा वापर करून शेतकरी बांधवांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here