कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
74

पुणे, दि.४: श्री एकविरा देवीचे मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे. त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिर व परिसराच्या विकासासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्ले, ता.मावळ येथील श्री एकविरा आई देवी देवस्थान परिसरातील मंदिराचे जतन, संवर्धन व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार आणि मंदिराचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, श्री एकविरा देवी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे, सरपंच पूजा पडवळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर सुरु आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. श्री एकविरा आई देवस्थानच्या पावन भूमीत मंदिर संवर्धन आणि भाविकांच्या सुविधांसाठी विविध विकास कामांचे माझ्या हस्ते भूमिपूजन होत आहे याचा मला आनंद आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्व सामान्यांसाठी विविध लोककल्याणकारी योजना शासनाने सुरु केल्या असून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. राज्यात मोठ मोठे प्रकल्प व उद्योग  उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अमंलबजावणी सुरु आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

कार्ले येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीचा विकास करण्यासाठी आवश्यक अनुदान देण्यात येणार असून लवकरच पोलीस चौकीही मंजूर करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी गडावर रोप-वे चे बांधकाम आणि  कार्ला फाट्यावर उड्डाण पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४५ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असून लवकरच कामाची सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियोजित विकास कामांची संक्षिप्त माहिती

श्री एकविरा देवी मंदिर, नगारखाना, स्तंभ व समाधी यांचा जीर्णोद्धार व मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य मंदिराची दुरूस्ती करणे, मंदिर परिसरातील नगारखान्याची दुरूस्ती करणे, स्तंभ व समाधीच्या दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणी आणि सुसंवादी प्रदिपण करणे, सध्याच्या रांग-मंडपाला उतरवून सुसंवादी शैलीचे रांग-मंडप उभारणे, मोकळ्याजागेत बगीचा निर्माण करणे, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या कक्षाचे बांधकाम, तिकीटघर व शौचालय यांची नवीन सुसंवादी वास्तू बांधणे या कामांचा समावेश आहे. गडावरील पायऱ्यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत,शौचालय, पार्किंग, डोंगराच्या कठडयाला  लागून दगडी पादचारी रस्ता तयार करणे, धबधब्या जवळ तटबंदीची दुरुस्ती करून विश्रांती क्षेत्र तयार करणे, पायऱ्यांच्या मध्यंतरात दमलेल्या भाविकांसाठी प्याऊ, बेंच आणि कचरापेट्या बसवणे, भाविक व पर्यटकांच्या माहिती व सुरक्षतेसाठी सूचना फलके बसविणे, ही कामे करण्यात येणार आहेत.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here