मावळ तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

0
65

पुणे, दि. ४:  मावळ तालुक्यात लोणावळ्यासारखे पर्यटनस्थळ आहे, श्री.एकवीरा देवी सारखे तीर्थ क्षेत्र असून तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मावळ तालुक्यातील कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मावळ तालुक्याच्या विकासासाठी शासनाने ४ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे केली आहे. त्या तरतुदीतून अनेक विकास कामे सुरू आहेत. नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पीएमआरडीएकडून इंद्रायणी नदी साठी ७९३ कोटी रुपये तर पवना नदीसाठी १५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळी अधिकचे पर्यटक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. कार्ला येथील श्री एकवीरा देवी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना विविध सुविधासाठी,सर्व उपाय योजना करण्यात येत आहे. या तालुक्याचा विस्तार होत आहे. उद्योगांची वाढ होत असून अतिरिक्त सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

काल मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक बाब घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते दसरा दिवाळी सण लक्षात घेऊन १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात  जमा होतील.

शासनाने सर्व सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली.मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र योजना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देण्यात येते. महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.  सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या सारख्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील विद्यार्थांना शैक्षिणक मदत करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी आमदार श्री. शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण तर विविध विकासकामाचे भूमिपूजन केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here