महाराष्ट्र आणि जर्मनीचे परस्पर संबंध अधिक मजबूत होतील – मंत्री दीपक केसरकर

‘डे ऑफ जर्मन युनिटी’ निमित्त दिल्या शुभेच्छा

मुंबई दि. ४:  भारत आणि जर्मनीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे मुंबई आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी असून महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग या राज्यांमध्ये झालेल्या कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या करारामुळे भविष्यात हे संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ‘डे ऑफ जर्मन युनिटी २०२४’ निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जर्मन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, जर्मनीमधील व्यावसायिक शिक्षण उच्च दर्जाचे असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात देखील व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. सर्व क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर समन्वयाने काम करूया, असे सांगून श्री. केसरकर यांनी मुंबईतील जर्मन नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग राज्यांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी झालेल्या करारामध्ये मंत्री श्री. केसरकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन ‘डे ऑफ जर्मन युनिटी’ साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

०००

बी.सी.झंवर/विसंअ