पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
254

छत्रपती संभाजीनगर, दि.6, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले.

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ  समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने 15 हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष  महादेव नागरगोजे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव नागरगोजे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पोलीस पाटील यांनी सत्कार केला.

सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक कान आणि डोळे आहेत. आपल्याला 24 बाय 7 काम करावे लागते. सरकारही असेच 24 बाय 7 काम करणारे आहे.  आपले हे प्रामाणिक काम असल्यानेच शासनाने आपले मानधन साडेसहा हजार रुपयांवरुन 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सढळ हस्ते न्याय दिला आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुटुंबातील प्रत्येक घटकाला शासन लाभ देत आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक सबलीकरण, शेतकरी अशा सर्व घटकांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या गावात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारभारी पाटील यांनी आभार मानले.

०००००

author avatar
Team DGIPR

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here